Ticker

6/recent/ticker-posts

बांबरपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

 




श्रमदानातून उभारले वनराई बंधारे; जलसंवर्धनासह श्रमप्रतिष्ठेचा दिला संदेश



दैनिक लोकयुवा  पालघरजिल्हा प्रतिनिधी फैजान खान

 सामाजिक बांधिलकीची जाणीव, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि श्रमप्रतिष्ठेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा बांबरपाडा (तिलोंडा) येथील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.


शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत प्रत्यक्ष श्रमदान करून वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक पाणीसाठा व्हावा, भूजल पातळीत वाढ व्हावी आणि परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास हातभार लागावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.


या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे महत्त्व केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आले. श्रमप्रतिष्ठा, संघभावना, सामाजिक जबाबदारी, सहकार्य आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलता यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम या उपक्रमातून झाले. शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता समाज आणि निसर्गाशी जोडण्याचा शाळेचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला.


या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती मनिषा बांबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत बरफ, तसेच पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पिंपळशेत केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रफुल्ल पाटील सर यांनीही प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होऊन सहकार्य केले. तसेच शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. उमेश जाबर सर यांनी उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सदर उपक्रम शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री.सुनिल भसरा सर यांच्या कल्पनेतून यशस्वी करण्यात आला. 


'थेंब थेंब साचवू पाणी, समृद्ध करू आपली धरणी!' या संदेशाला कृतीची जोड देत बांबरपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या छोट्याशा श्रमदानातून जलसंवर्धनाचा मोठा विचार रुजविणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments