पीक नुकसानीपोटी हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी; वळण योजनेलाही विरोध
प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे
सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नागझरी फाटा येथील सद्गुरू ज्ञानानंदजी महाराज मंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतीपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, प्रस्तावित वळण योजनेला विरोध करावा आणि रखडलेली विकासकामे तातडीने सुरू करावीत, अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
पावसाअभावी भात, नागली, वरई पिकांचे नुकसान घाटमाथा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने भात, नागली, वरई यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्य हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
पाणी असूनही वीज नसल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर
शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शेतीपंपांसाठी पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, डोळ्यांदेखत पिके वाळत असून शेतकरी हतबल झाले आहेत. उरलेली पिके वाचविण्यासाठी शेतीपंपांना पुरेसा वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या वीजजोडणी व्यवस्थेमुळे सुरळीत वीजपुरवठा होणे शक्य नसल्याची चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे देवसाणे येथून नवीन वीजजोडणी करून घाटमाथा परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रस्तावित वळण योजनेला विरोध सुरगाणा तालुक्यातील विविध ठिकाणी धरणे
बांधून पाणीसाठा करणे आणि डोंगरमाथ्यावरील बोगद्यांद्वारे हे पाणी पूर्वेकडील भागात वळविण्याच्या प्रस्तावित वळण योजनेबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या योजनेमुळे धरण क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमीन बाधित होण्याची आणि अनेक आदिवासी कुटुंबांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. तसेच बोगद्यांमुळे घाटमाथा परिसरावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि आदिवासी कुटुंबांच्या हिताचा विचार करून या योजनेला विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रखडलेला रस्ता आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर भितबारी ते नणापाडा रस्त्याचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून मागेल त्याला काम द्यावे आणि रोजगाराअभावी तालुक्याबाहेर होणारे स्थलांतर थांबवावे, यावरही चर्चा झाली.
प्रश्न न सुटल्यास मोर्चा, उपोषण आणि रास्ता रोको शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी निवेदने, अर्ज आणि विनंत्या करूनही प्रश्न मार्गी लागत नसतील, तर आता व्यापक जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. संबंधित मागण्यांसाठी शासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात येईल. तरीही प्रश्न सुटले नाहीत, तर मोर्चा, उपोषण, धरणे आंदोलन किंवा रास्ता रोको यांसारखी आंदोलने करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीला प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती या बैठकीला मोहन गांगुर्डे, स्वप्निलभाऊ आहेर. तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड, दत्तू पिठे, देवराम जोपळे, गणपत भोये, भगवान गायकवाड, कृष्णा गायकवाड, भास्कर हाडस, रोहिदास मोरे, खंडू दळवी, रतन गावित, भास्कर राऊळ, नामदेव लिलके, बागुल. हरी पवार, वसंत पिठे यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

0 Comments