आदिवासी युवकांच्या हातात उद्योगाची चावी द्या; अक्षय सिडाम यांची आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री मा प्रा. डॉ अशोकराव उईके यांच्याकडे मागणी लवकरच विभागीय बैठक घेण्याचे मंत्र्यांचे आश्वासन
पांढरकवडा, :- दि. ४ ऑक्टोबर २०२६ :
आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना केवळ नोकरीच्या प्रतीक्षेत न ठेवता त्यांना लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय सिडाम यांनी आदिवासी विकास मंत्री मा प्रा. डॉ. अशोकराव उईके यांच्याकडे केली.मा. श्री. बंडूमामा सोयाम यांचे चिरंजीव अभिषेक सोयाम यांनी उभारलेल्या फ्लाय ॲश ब्रिक्स अँड पेव्हर ब्लॉक मेकिंग प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी अक्षय सिडाम यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न मंत्री अशोकराव उईके यांच्या समोर मांडला.आदिवासी युवकांना लघुउद्योग उभारण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत मार्गदर्शन शिबिरे, उद्योग प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आवश्यक आर्थिक सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
योग्य मार्गदर्शन आणि भांडवली मदत मिळाल्यास आदिवासी युवक स्वतःच्या पायावर उभे राहण्यासोबतच इतर युवकांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतील, असे अक्षय सिडाम यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अक्षय सिडाम यांनी मांडलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री अशोकराव उईके यांनी लवकरच विभागीय बैठक घेऊन आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवकांना लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी शासनाकडून ठोस सहकार्य मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

0 Comments