Ticker

6/recent/ticker-posts

वैजापूरमध्ये प्रवासी महिलेवर रिक्षात बलात्कार; फरार संशयित रिक्षाचालकाला जालन्यातून अटक!...

 



दोन मुलांचा बाप असलेल्या २९ वर्षीय संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्ह्यातील रिक्षाही जप्त...


लोकयुवा न्यूज नेटवर्क वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे.

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात निर्जनस्थळी रिक्षा थांबवून ३० वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार संशयित रिक्षाचालकाला वैजापूर पोलिसांनी बुधवारी (२८ ऑक्टोबर) जालन्यातून अटक केली. नारायण शेखनाथ हरकल (वय २९, रा. जीवनगंगा सोसायटी, वैजापूर) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास घडली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला होता. सुरुवातीला पोलिसांकडे केवळ रिक्षाचे वर्णन उपलब्ध होते. दरम्यान, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एमएच २० बीटी ८०८६ क्रमांकाची रिक्षा दिसून आली. त्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.

पोलिसांनी रिक्षाच्या मालकाचा शोध घेतला असता संबंधित रिक्षा भाडेतत्त्वावर दिल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्यात आली. संशयित रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला जालन्यातून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.

संशयिताने प्रेमविवाह केला असून त्याला दोन मुले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाडळे, अमोल कांबळे, अभिजित डहाळे आणि गणेश काळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.

पतीसोबतच्या वादानंतर महिला घराबाहेर पडली होती मिळालेल्या माहितीनुसार, पतीसोबत भांडण झाल्यानंतर ३० वर्षीय महिला रागाच्या भरात घराबाहेर पडली होती. याचवेळी रिक्षाचालकाने तिला रिक्षात बसवले आणि निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्याचाही प्रयत्न केला.

मात्र, महिलेने प्रतिकार करून तेथून पळ काढला आणि जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर आश्रय घेतला. टपरीचालकाच्या मदतीने तिने पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला पोलीस ठाण्यात आणले होते.


Post a Comment

0 Comments