Ticker

6/recent/ticker-posts

भक्तिमय वातावरणात दुर्गा व शारदा देवीच्या मूर्तींचे विसर्जन; मानोरा तालुक्यात धार्मिक उत्साहाला उधाण



 दै लोकयुवा मानोरा 

मानोरा : नवरात्रोत्सवानिमित्त मानोरा तालुक्यात गावोगावी भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या दुर्गामाता व शारदा देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, देवीचा जयघोष आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागातून धार्मिक परंपरेचे दर्शन घडत आहे. दरम्यान, मानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३० गावांमधील ३१ दुर्गामातेच्या मूर्तींसह मानोरा शहरातील एका शारदा देवीच्या मूर्तीचे २१ ऑक्टोबर रोजी शांततेत विसर्जन पार पडले.

मानोरा तालुक्यात ११ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला होता. ग्रामीण भागातील ५८ आणि मानोरा शहरातील चार ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील हिवरा येथे एका, तर मानोरा शहरात आठ ठिकाणी शारदा देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. नऊ दिवसांच्या उपासना, पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांनंतर आता देवीला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे.

 २१ ऑक्टोबर रोजी मानोरा, रोहणा, कारखेडा, दापुरा, कुपटा, उमरी खुर्द, शिवणी, आमकिन्ही यांसह ३० गावांमधील ३१ दुर्गामातेच्या मूर्तींचे, तसेच मानोरा शहरातील एका शारदा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत विसर्जनाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

धार्मिक उत्साहासोबत सामाजिक सलोखा

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नसून सामूहिक सहभाग, सामाजिक एकोपा आणि परंपरा जपण्याचे माध्यमही आहे. देवीच्या विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांनी एकत्र येत उत्सवाला निरोप दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

२२ ऑक्टोबर रोजी आणखी २३ दुर्गा व सात शारदा देवींचे विसर्जन

दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी मानोरा शहरातील चार आणि ग्रामीण भागातील १९ अशा एकूण २३ दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये फुलउमरी, इंजोरी, दापुरा बु. आणि गिरोली आदी गावांचा समावेश असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाचे जमादार दत्तात्रय भावके यांनी दिली. याशिवाय सात शारदा देवींच्या मूर्तींचेही विसर्जन होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित विसर्जन सोहळ्यांकडे तालुक्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments