Ticker

6/recent/ticker-posts

विजयादशमी आणि संस्कृति संवर्धन मंडळाच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त संस्था प्रमुखांचा कार्यकर्त्यांशी संवाद : संस्था ध्वजास विद्यार्थ्याची मानवंदना



बिलोली प्रतीनीधी:विनोद वाघमारे 

"यशाचा आनंद साजरा करताना अपयशातून शिकण्याची तयारी ठेवणे आणि त्यामागील कारणांचा प्रामाणिकपणे शोध घेणे, हीच प्रगतीची खरी दिशा आहे. अपेक्षित यश मिळाले नाही, तरी अपयश लपविण्याऐवजी ते खुलेपणाने स्वीकारून त्याची योग्य कारणमीमांसा केल्यास नव्या संधी निर्माण होतात आणि सामूहिक प्रयत्नांतून अधिक सक्षमपणे पुढे जाता येते. विद्यार्थ्यांमधील अपयशाची भीती दूर करून त्यांना नव्या आव्हानांसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन संस्कृति संवर्धन मंडळाचे संस्थाप्रमुख श्री. प्रमोद देशमुख यांनी केले. विजयादशमी आणि संस्थेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते संस्था कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

विद्यार्थ्यांमधील अपयशाची भीती दूर करण्यासाठी समुपदेशनाची प्रभावी व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेतील एक-दोन व्यक्तींनी आवश्यक प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही त्यांनी सुचविले. वैचारिक सीमा ओलांडून नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे, हेच आजच्या काळातील सीमोल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी अमेरिकन फील्ड सर्व्हिसेस (AFS) आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मेळाव्यासाठी गुवाहाटी येथे रवाना होणाऱ्या छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि मिलेनियम – द कॉन्सेप्ट स्कूलच्या विद्यार्थी व अध्यापकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संकुलातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि अश्वपूजन करण्यात आले. विजयादशमीच्या मंगलमय वातावरणात संस्थेच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments