जव्हार, दि.१४; प्रतिनिधी फैजान खान
जव्हार: ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांगरमोडा व न्याहाळे बुद्रुक येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून करण्यात आले. एकात्मिक आदर्श ग्राम विकास प्रकल्पांतर्गत माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, रिनोव्हेट इंडिया यांच्या सहकार्याने आणि मोसंबी (Mosambee) यांच्या सीएसआर उपक्रमातून हे शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाचा एकूण २०० ग्रामस्थांनी लाभ घेतला.
शिबिरात ९८ ग्रामस्थांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच १०२ नागरिकांची नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत आय ड्रॉप्स आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना चष्म्यांमुळे स्पष्ट दिसण्यास मदत झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचला. तसेच विविध आजारांचे वेळेवर निदान होण्यास मदत झाली. आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासह प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष अविनाश चौहान म्हणाले, “एकात्मिक आदर्श ग्राम विकास प्रकल्पातून गावांचा सर्वांगीण विकास साधताना आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. ग्रामस्थांचा प्रतिसाद प्रेरणादायी असून, मोसंबी आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या सहकार्याने असे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येतील.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

0 Comments