Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व जागतिक अवयवदान दिनानिमित्त अभिवादन व जनजागृती कार्यक्रम



*धड़गांव ता. प्रतिनिधी, वसंत पावरा* 

मोराणे (धुळे), दि. १३ ऑगस्ट २०२६ : समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे आणि भागाबाई आनंदा वाघ प्राथमिक आश्रमशाळा, मोराणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन तसेच जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती व विचारप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना गावित उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक श्री. सुयश दिनकर पाटील, श्री. शिंदे सर, इतर शिक्षक व कर्मचारी, क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्रीमती मीना गावित यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अहिल्याबाई होळकर यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, लोककल्याणाची भूमिका, महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य तसेच मंदिर, घाट, विहिरी आणि धर्मशाळांच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी समाजसेवा, न्याय, समता आणि लोककल्याणाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच जागतिक अवयवदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. अवयवदानाचे महत्त्व, त्याचे सामाजिक फायदे आणि गरजू रुग्णांसाठी असलेली आवश्यकता याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, त्यामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी घोषवाक्ये सादर करून जनजागृतीपर संदेश दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती वाढविण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. शितल बागुल या क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीने केले. यावेळी क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी डिंपल भोये, मनीष बागुल, कविता भोये, गणेश बागुल आणि शितल बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी व क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments