धड़गाव प्रतिनिधी: _ वसंत पावरा
सातपुड्याच्या डोंगर रांगातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा थेवापाणी, ता. तळोदा जि. नंदुरबार येथे शाळाप्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेचा परिसर फुले, रंगीबिरंगी फुगे आणि आकर्षक सजावटीने सजला होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि नव्या आशा दिसून येत होत्या.
श्रीमती स्नेहल सर्जेराव गुगळे यांनी पहिलीत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे औक्षण करून त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. त्यांच्या तोंडात मोतीचूरचा लाडू भरवून शाळेतील शिक्षणप्रवासाची गोड सुरुवात करण्यात आली.मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले त्यांचे पहिले पाऊल आयुष्यभर स्मरणात राहावे म्हणून त्यांच्या पावलांचा ठसा जतन करण्यात आला.
विद्यार्थ्यांसोबत शाळेत आलेल्या पालकांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत सपकाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले. शिक्षणाच्या नव्या प्रवासाची सुरुवात ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या या सुंदर भेटीने झाली.
"एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातांसोबत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि मातृप्रेमाचा सुंदर संदेश देण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनासोबत मिष्टान्नाची व्यवस्था करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम रामजी वळवी, मातृ-पालक संघाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई तसेच पालकवर्ग यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे मॅडमयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
"शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून प्रत्येक बालकाच्या स्वप्नांना पंख देणारे प्रेरणास्थान आहे. आनंददायी वातावरण, प्रेमळ सहवास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याची वाट घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे."
✍️ श्रीमती स्नेहल सर्जेराव गुगळे
प्राथमिक शिक्षिका
जि. प. शाळा थेवापाणी,
ता.तळोदा, जि. नंदुरबार

0 Comments