आळते, प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मजले, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी आणि आळते या गावांमध्ये शेकडो वर्षांची परंपरा जपत सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन पीर पंजांची प्रतिष्ठापना करत आहेत. विशेष म्हणजे काही गावांमध्ये मुस्लिम कुटुंब नसतानाही ग्रामस्थ परंपरेनुसार मोहरम सण साजरा करून सामाजिक सलोखा आणि एकतेचा आदर्श जपत आहेत.
मोहरमच्या पहिल्या तारखेपासून ते जारता (महाप्रसाद) कार्यक्रमापर्यंत सुमारे पंधरा दिवस विविध धार्मिक आणि पारंपरिक विधी पार पडतात. कुदळ मारणे, पंजे बसवणे, भेटीगाठी, विसर्जन यासह सर्व कार्यक्रमांचे ग्रामस्थांकडून नेटके नियोजन केले जाते. गावातून विवाह होऊन बाहेर गेलेल्या मुलीही या उत्सवासाठी माहेरी येत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
आळते गावातही हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात मोहरम साजरा करतात. येथे दर्ग्यात सुमारे १९ पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात येते. खत्तल रात्री पेटविण्यात येणारी खाई हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. नवस पूर्ण झालेल्या भाविकांकडून प्रखर श्रद्धेने या खाईतून जाण्याची परंपरा आजही जपली जात आहे. पंचक्रोशीतील सर्वांत मोठा मोहरम उत्सव आळते येथे होत असल्याची ओळख आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावकरी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येतात, हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरते.
लक्ष्मीवाडी येथील मोहरम खाना तसेच बिरदेववाडीच्या वेशीवरील मोहरम खान्यात पाचव्या तारखेला पीर पंजांची प्रतिष्ठापना करून भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सातव्या तारखेला मध्यरात्रीनंतर सर्व पंजे बाहेर काढण्यात येतात. ढोल-ताशांच्या गजरात पंजे खेळवले जातात आणि निमंत्रित गावांमध्ये भेटीसाठी नेले जातात.
खत्तल रात्रीच्या दिवशी सकाळी खाई पूजन केले जाते. गावातील बैलगाड्या व इतर वाहने सजवून खाईला पाणी घालण्याची परंपरा पार पाडली जाते. सायंकाळी मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत खाई प्रज्वलित केली जाते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास खाईतून जाण्याचा धार्मिक विधी पार पडतो. बुरुज खेळ झाल्यानंतर सर्व पंजे भेटीसाठी रवाना होतात.
मोहरमच्या निमित्ताने हातकणंगले तालुक्यातील या गावांमध्ये धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

0 Comments