सह धर्मदाय आयुक्त हिराताई शेळके यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली
श्रीक्षेत्र माहूर-(अपील बेलखोडे)
श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी नांदेडच्या सहधर्मदाय आयुक्त हिराताई शेळके यांनी गुरुवार, ४ जून रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना केली.
राज्य शासनाने २९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील आदेशानुसार त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संस्थानच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून देवस्थान व्यवस्थापनाची जबाबदारी आता धर्मदाय विभागाकडे आली आहे.
यापूर्वी २०१४ पासून संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे होती. मात्र, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार देवस्थानांच्या व्यवस्थापनातील न्यायालयीन प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ५०(बी) अंतर्गत संबंधित देवस्थानांच्या विश्वस्त मंडळांमध्ये न्यायाधीशांच्या जागी सहायक धर्मदाय आयुक्त अथवा सहधर्मदाय आयुक्त यांची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या बदलाच्या अनुषंगाने श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सहधर्मदाय आयुक्तांकडे सोपविण्यात आली असून संस्थानच्या विश्वस्त मंडळातील पुढील नियुक्त्यांचे अधिकारही त्यांच्याकडेच राहणार आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना हिराताई शेळके यांनी सध्या कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी व अशासकीय विश्वस्त हे सन २०२९ पर्यंत आपल्या पदावर कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले.
यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फांदाडे, अरविंद देव, दुर्गादास भोपी, संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, योगेश साबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

0 Comments