Ticker

6/recent/ticker-posts

बीड पोलिसांचा अनोखा उपक्रम; नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी!



जिल्हा.  प्रतिनिधी  .सागर काळे

बीड: वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून बीड पोलिसांनी आज एक अनोखी मोहीम राबविली. प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलिसांनी बीड येथील जिल्हा कारागृहासमोर आणि नगर नाका परिसरात ही कारवाई केली. वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या नेतृत्वाखाली नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना केवळ दंड न थोटावता, त्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, कागदपत्रे, इन्शुरन्स, पीयुसी किंवा लायसन्स नसणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना थांबवून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अनोख्या गांधीगिरीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५६ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून एकूण ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत स्थानिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments