बागवडे मळा येथे कृषी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर जिल्ह्यातील बागवडे मळा येथे छत्रपती शाहू कृषी महाविद्यालय, कोल्हापूर (विस्तार विभाग), पीक उत्पादन खर्च योजना – कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि जय जवान जय किसान कृषी उत्पादक मंडळ, आळते यांच्या संयुक्त विद्यमाने “खेत बचाओ अभियान” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पशुपालन, शासकीय योजना आणि खर्च व्यवस्थापन याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. प्रा. सुधीर सूर्यगंध (कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे) यांनी किफायतशीर दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करत दुग्ध व्यवसायातील नफा वाढविण्याच्या प्रभावी उपाययोजना स्पष्ट केल्या.
यावेळी पशुसंवर्धन अधिकारी श्री. शरद गायकवाड यांनी पशुपालक व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. श्री. सुहास पाटील (पाणी फाउंडेशन) यांनी अल-नॅनो तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व विशद केले. तसेच कृषी सहाय्यक श्री. बी. डी. आवळे यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, जैविक खतांचे महत्त्व आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
कृषी अर्थशास्त्र विभाग, राहुरीचे श्री. संदीप हळदे यांनी पीक उत्पादन खर्च योजना विषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना खर्च नोंदींचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास बापूसो शेळके, अजित कोळाज, बाळासो संकन्ना, दीपक कासार, गणपती कोळाज यांच्यासह जय जवान जय किसान कृषी उत्पादक मंडळाचे सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर उत्तम नलवडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अण्णासो अंकलीकर सर यांनी केले.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि शाश्वत शेतीचे मार्गदर्शन देणारा हा उपक्रम ज्ञानवर्धक ठरला असून उपस्थित शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचे विशेष स्वागत केले.

0 Comments