Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित दोन कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


 श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) : 

माहूर नगरपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत   कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अखेर माहूर पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यापासून या प्रकरणी तक्रारी, आंदोलने व चौकशीची मागणी सुरू होती. अखेर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने तीन मान्यताप्राप्त कंपन्यांची नियुक्ती केली होती. मात्र, त्या कंपन्यांना डावलून एका कथित खासगी कंपनीच्या माध्यमातून योजना राबविण्यात आल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. शासनाकडून प्राप्त झालेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न होता संबंधित खासगी कंपनीच्या खात्यावर वळविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या कथित गैरव्यवहाराविरोधात विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद तुपदाळे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

अखेर या प्रकरणी महेश विष्णू चव्हाण (वय ४१), सहाय्यक पोलीस निरीक्षक, दक्षता व सुरक्षा विभाग, म्हाडा, मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ११२/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ४०९, ४२० व ३४ अंतर्गत मंगळवारी (२४ जून) माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०१८ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याऐवजी तो इतर खात्यांमध्ये अनियमितपणे वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. चौकशीत ₹ २,०७,०१,७२४ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या कंपन्यांऐवजी कथित खासगी कंपनीला काम कसे देण्यात आले, निधी नेमका कोणी व कोणाच्या आदेशाने वळविला, यासंदर्भात नगरपंचायत सभागृहाची मंजुरी होती का, तसेच या संपूर्ण व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता का, याबाबत आता पोलीस तपासातून वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments