Ticker

6/recent/ticker-posts

'अलविदा-ओ-अलविदा, शाहे शहीदा अलविदा'च्या गायनाने मोहरमची भावपूर्ण सांगता



हातकणंगले परिसरात श्रद्धा, शांतता आणि बंधुत्वाचे दर्शन


हातकणंगले : 'अलविदा-ओ-अलविदा, शाहे शहीदा अलविदा' या करुण स्वरांनी परिसर दुमदुमत असताना हातकणंगले तालुक्यातील आलते, हातकणंगले, मजले, बिरदेववाडी आणि लक्ष्मीवाडी येथे मोहरम उत्सवाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. दहाव्या दिवशी ताजियांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात श्रद्धा, शिस्त आणि धार्मिक ऐक्याचे दर्शन घडले.


मोहरमच्या निमित्ताने विविध गावांमध्ये पारंपरिक धार्मिक विधी, मिरवणुका आणि शोकपर कार्यक्रम पार पडले. 'अलविदा-ओ-अलविदा, शाहे शहीदा अलविदा' या गायणाने वातावरण भावूक झाले. हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण करत अनेकांनी मानवता, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला.


उत्सवादरम्यान सर्व धर्मीय नागरिकांनी एकोप्याने सहभाग घेत सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आदर्श निर्माण केला. गावोगावी ग्रामस्थ, युवक मंडळे, मोहरम कमिट्या आणि स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध व्यवस्था राखत उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


मोहरमच्या सांगतेनंतर भाविकांनी ताजियांना अश्रुपूर्ण निरोप देत पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची प्रार्थना केली. श्रद्धा, त्याग, बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा मोहरम उत्सव हातकणंगले परिसरात शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.




Post a Comment

0 Comments