Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांच्या सेवेसाठी विधायक उपक्रम; आ. भीमराव केराम यांच्या हस्ते साहित्य वाटप



श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे) – 

समाजातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपू महामुने मित्र मंडळाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सहाय्यक साहित्य वितरण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी (दि. २७ जून २०२६) बालाजी मंगल कार्यालय, माहूर येथे झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ४४४ लाभार्थ्यांना ५२ लाख रुपयांच्या सहाय्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमात विविध प्रकारच्या अत्याधुनिक सहाय्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यामध्ये १९७ दिव्यांग आणि २४७ ज्येष्ठ नागरिक, अशा एकूण ४४४ लाभार्थ्यांचा समावेश होता. लाभार्थ्यांना काठी, कंबर व गुडघ्याचे बेल्ट, स्टिक विथ स्टूल, वॉकर, व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल, रोलॅटर, सुगम केन, स्मार्ट केन, स्मार्टफोन, मोटाराइज्ड ट्रायसायकल, सी.पी. चेअर आदी जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

सहाय्यक साहित्य हाती पडताच अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव उमटले. अनेक लाभार्थ्यांनी या उपक्रमामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होणार असल्याची भावना व्यक्त करत आयोजकांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, तालुकाध्यक्ष नीलकंठ मस्के, संजय राठोड, विष्णू वैरागड, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, नंदू कोलपवार, शोभाताई महामुने, पद्माताई गिऱ्हे, स्वातीताई आडे, वानखडे ताई, शाम कुमरे, आनंद मच्छेवार, विजय आमले, बन्सगोपाल अग्रहरी, बाबुभाई, अपील बेलखोडे, विनायक मुसळे, रामकिसन केंद्रे, निलेश तायडे, ओम पाटील, योगेश परसवाळे, विक्की तामखाने, रोहित वाघमारे, सोनू पाटील, जयकांत मोरे पाटील, सागर चुंगडे, अंकुश शिंदे, विशाल खरे, नवनीत देवपूलवार, मनीष राठोड, मंगेश कपाटे, स्वप्निल सलाम, पप्पू वाघमारे, राजकिरण देशमुख, विकी सुने, निरंजन मरवाळे, सुरज वटाणे, जय मानतुटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार गोपू महामुने यांनी मानले.

"दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी गोपू महामुने यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. आज शेकडो लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे. समाजसेवेची ही भावना कायम ठेवून भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील."-भीमराव केराम आमदार किनवट माहूर विधानसभा*

Post a Comment

0 Comments