Ticker

6/recent/ticker-posts

अखंड दत्तनाम व अन्नदान सोहळ्याच्या सांगतेला कुंभमेळ्याचे स्वरूप



 १५ हजार भाविकांच्या उपस्थितीत आध्यात्मिक पर्व संपन्न.

श्रीक्षेञ माहूर - अपील बेलखोडे 

श्री दत्त मठ संस्थान, ब्रम्हपुरी झटाळा (तरोडा) येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या अखंड दत्तनाम व अखंड अन्नदान सप्ताहाची सांगता रविवारी, दि. १४ जून २०२६ रोजी अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या भव्य सोहळ्याला हजारो भाविकांसह विविध भागांतील साधू, संत आणि महंतांची उपस्थिती लाभल्याने परिसराला अक्षरशः कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्ष, दर्श अमावास्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निज आत्मबोध ग्रंथ सत्संग व ज्ञानचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.विदर्भ व मराठवाड्यातील अनेक संत-महंतांनी या आध्यात्मिक पर्वाला उपस्थिती लावून भाविकांना दर्शन व मार्गदर्शनाचा लाभ दिला. कार्यक्रमादरम्यान निसर्गानेही हलक्या सरींची बरसात करून जणू साधुसंतांचे स्वागतच केले.सुमारे १४ ते १५ हजार भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. 

कार्यक्रमाची सुरुवात माता अनुसया व श्री दत्त प्रभू यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मठाधिपती श्री संत शहापुरी महाराज यांच्या हस्ते उपस्थित साधुसंत व महंतांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला महंत ज्ञानेश्वर भारती महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.महंत,साधु,संत  यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील अनेक गावांतील भाविक भक्तांनी तन, मन आणि धनाने सेवा देत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

या भव्य-दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचे विदर्भ व मराठवाड्यातील साधुसंत तसेच भाविक भक्तांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संत शहापुरी महाराज यांनी उपस्थित सर्व साधुसंत, महंत, सेवेकरी व भाविक भक्तांचे मनःपूर्वक आभार मानत दत्तभक्ती, नामस्मरण व समाजसेवेचा संदेश दिला.अखंड दत्तनाम, अन्नदान, सत्संग आणि संतसंगती यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments