जिल्हा प्रतिनिधी .सागर काळे
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचा १८ क्विंटल कापूस आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या घरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आगीची तीव्रता एवढी भीषण होती की घरातील मौल्यवान ऐवज आणि कापूस वाचवता आला नाही. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे ८ लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. कष्टाने पिकवलेला पांढरा सोन्यासारखा कापूस डोळ्यांदेखत जळताना पाहून कुलकर्णी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी आता परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

0 Comments