नवीन सभापती व सदस्यांसमोर प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान....
वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर : पंचायत समितीच्या प्रशासक कार्यकाळात रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो विकासकामांना मंजुरी मिळूनही अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. पंचायत समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १७,३३८ गायगोठ्यांपैकी ५,६९३, ७,६८८ सिंचन विहिरींपैकी २,९३९ आणि ५७८ पाणंद रस्त्यांपैकी ३२३ कामे आजही रखडलेली आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
निधीचा अभाव, कामे सुरू करण्यात झालेला विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई ही मुख्य कारणे प्रशासनाकडून पुढे केली जात आहेत. दरम्यान, पंचायत समितीत नव्याने निवडून आलेल्या सभापती व सदस्यांसमोर रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
वैजापूर पंचायत समितीत नवीन सदस्यांनी नुकतीच शपथ घेतली असली तरी गावागावांतील प्रलंबित कामांच्या फाईली अजूनही धूळ खात पडल्या आहेत. तब्बल १६ हजार २३५ रोजगार हमी योजनेच्या कामांचा बॅकलॉग असून, अर्धवट गायगोठे, विहिरी, अपूर्ण पाणंद रस्ते, प्रलंबित मस्टर आणि निधीअभावी थांबलेली विकासकामे यामुळे जनतेत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे प्रशासक काळात नऊ प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाली होती. आता पुन्हा प्रभारी व्यवस्थेवर पंचायत समितीचा कारभार सुरू राहणार असल्याने “बदल नेमका कुठे झाला?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
२२ मार्च रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत नवीन राजकीय समीकरणांवर अधिक चर्चा झाली, तर २२ एप्रिलच्या दुसऱ्या बैठकीत रखडलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात गावपातळीवर मोठा बदल अद्याप दिसून आलेला नाही.
पंचायत समिती सदस्य राहुल लांडे यांनी सांगितले की, “नागरिकांनी बदलाच्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे रखडलेली कामे, प्रलंबित मस्टर आणि निधी वितरणातील अडचणींबाबत प्रशासनाला जाब विचारला जाईल. फक्त मंजुरी नव्हे, तर प्रत्यक्ष कामे पूर्ण होणे आवश्यक आहे.”
गटविकास अधिकारी सुहास वाघचोरे यांनीही मोठ्या प्रमाणात रोहयो कामे प्रलंबित असल्याचे मान्य केले. रोजगार सेवकांचा संप संपल्यानंतर रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments