Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन



नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह

 भारतीय हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, 11 व 12 मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलक्या रंगाचे सैल सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, ओला रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा अतिस्वेद यांसारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असेही सूचित करण्यात आले आहे. 

 शेतकऱ्यांनीही दुपारच्या कडक उन्हात शेतातील कामे टाळून पिकांना आवश्यकतेनुसार सिंचन सुरू ठेवावे, असे कृषी सल्ल्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या हवामान अंदाज व सूचनांकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 


Post a Comment

0 Comments