Ticker

6/recent/ticker-posts

दोन ड्रेस, आधार कार्ड घेऊन १५ वर्षीय मुलगी घरातून गायब.....



फूस लावून पळवल्याची तक्रार; वैजापूर तालुक्यातील घटना...


वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे.

वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १५ वर्षीय मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१ मे) रोजी मुलीची आई शेतात कामासाठी गेली होती, तर वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचवेळी मुलीने घर सोडल्याचे समोर आले. दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले.

कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलगी नववी इयत्तेत शिक्षण घेत असून, घरातून जाताना तिने दोन ड्रेस व आधार कार्ड सोबत घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुलीने अंगात गुलाबी रंगाचा टॉप व गुलाबी लेगीज परिधान केलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वैभव रणखांब करीत आहेत



Post a Comment

0 Comments