Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई महापौरपदासाठी शनिवारी अर्ज



मतदानापूर्वी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार


मुंबई : येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत.

पालिका निवडणूक निकालानंतर शिंदेसेना, भाजपने गट नोंदणी केली नव्हती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस दुखवटा असल्याने गटनोंदणी आणि महापौर निवड प्रक्रिया लांबली. सोमवारी भाजप व शिंदेसेनेने कोकण आयुक्त कार्यालयात नोंदणी केल्यानंतर महापौर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या ११ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्जाच्या छाननीनंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा केली जाते. त्यानंतर नवनियुक्त महापौरांकडून उपमहापौरांचे नाव जाहीर केले जाते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक शिंदेसेनेसोबत

निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेचे २९ असे मिळून ११८ नगरसेवक निवडून आल्याने महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. एक दोन दिवसांत महापौरांचे नावही जाहीर होईल. उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळणार आहे. मात्र समित्यांचे अध्यक्षपद कोणाकडे हेही दोन - तीन दिवसांत स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.


राष्ट्रवादी (अजित पवार) चे ३ नगरसेवक शिंदेसेनेत सामील होणार आहेत. त्यामुळे शिंदेसेनेची सदस्य संख्या ३२ वर जाणार असून शिंदेसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक सहभागी होणार असल्याने महायुतीची नगरसेवक संख्या १२१ वर पोहचणार आहे.

Post a Comment

0 Comments