नवीन पनवेल: वार्ताहर
नवीन पनवेल येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिल्लई विद्यापीठाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक क्षणी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, प्राचार्य एस जोशी, डॉक्टर निवेदिता श्रेयस यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
उद्घाटनापूर्वी मान्यवरांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे तसेच विद्यार्थ्यांच्या नवोपक्रम व स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “पिल्लई विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून, संशोधन, नवकल्पना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने देशाला घडवणारे विद्यापीठ ठरेल. महात्मा एज्युकेशन सोसायटीने प्रवर्तित केलेल्या पिल्लई विद्यापीठ नवी मुंबईचे औपचारिक उद्घाटन 10 फेब्रुवारी रोजी डॉ. के एम वासुदेवन पिल्लई कॅम्पस नवीन पनवेल येथे पार पडले. पिल्लई विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्यामध्ये जागतिक शैक्षणिक सहकार्य, संशोधन केंद्रित शिक्षण, तंत्रज्ञान सक्षम शिक्षण आणि विकसित भारत 2047 सारख्या राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित केले आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिल्लई विद्यापीठ मोलाचे कार्य करेल, तसेच संशोधन आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी हे विद्यापीठ एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवीन पनवेल व परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी हे विद्यापीठ नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. महात्मा एज्युकेशन सोसायटी तीन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार प्रदान करते आणि दरवर्षी 30 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देते. दर्जेदार शिक्षणाद्वारे राष्ट्र उभारणीचे त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवते.

0 Comments