Ticker

6/recent/ticker-posts

रात्रीच मिळाली होती सूचना; रुग्णांसाठी डॉक्टरांचे जागरण

 

                 संपाचा इशारा तरी 'मार्ड'चे डॉक्टर रुग्ण सेवेत

नांदेड : विष्णूपुरी येथील शासकीय  रुग्णालयात मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास एकाचवेळी विषबाधेचे शेकडो रुग्ण दाखल झाले. याबाबत पूर्वसूचना असल्यामुळे सर्व तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, सेवक यांना अगोदरच सज्ज ठेवण्यात आले होते. रात्री तीन वाजेपासून ते सकाळ होईपर्यंत प्रत्येक जण एक-एक जीव वाचविण्यासाठी अक्षरशः धावपळ करीत होता. विशेष म्हणजे, संपाचा इशारा दिलेल्या 'मार्ड'च्या डॉक्टरांनीही स्वतःला रात्रभर आरोग्य सेवेत झोकून दिले होते.

विष्णूपुरी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांना विषबाधेचे मोठ्या प्रमाणात रुग्ण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या. डॉक्टर, परिचारिका आणि सेवकांना अलर्ट राहण्यास कळविले. रुग्णालयात टप्याटप्याने वाहनातून शेकडो रुग्ण दाखल होत होते. या ठिकाणी जवळपास साडेपाचशे रुग्ण दाखल केल्यानंतर या ठिकाणची क्षमता संपली होती.नंतर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांच्या टीमने मोचा सांभाळला. या ठिकाणी दीडशे रुग्णांना दाखल केले. तत्पूर्वीच लोहा येथील रुग्णालय हाऊसफुल्ल झाले होते. मध्येच लोहा येथील सलाईनचा साठा संपल्याचे पोलिसांना कळाले पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी नांदेडहून सलाईन पाठविले.

                वैद्यकीय अधीक्षक रात्रभर तळ ठोकून

वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण हे रात्री ३ वाजेपासूनच रुग्णालयात तळ ठोकून होते. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळत आहेत की नाही याची ते जातीने पाहणी करीत होते. बुधवारी दुपारपर्यंत रुग्णालयातच मुक्काम करुन त्यांनी रुग्ण सेवेवर लक्ष दिले.

Post a Comment

0 Comments