ओडिशात मुक्काम ठोकला अन् ३५ लाखांची बॅग चोरटा पकडलो
नांदेड : मागील वर्षी सिडको भागातील एका सराफा व्यापाऱ्याची ३५ लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक महिने मेहनत घेतली. त्यासाठी ओडिशात जवळपास महिनाभर मुक्काम ठोकला, त्या ठिकाणी खबऱ्याचे नेटवर्क उभे केले अन् आरोपी सोने विक्रीसाठी पुन्हा नांदेडात आल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीकडून चोरीतील ८ लाख १८ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी
दिली. सिडकोतील सराफा व्यापारी प्रभाकर डहाळे हे सकाळच्या वेळी दुकान उघडण्यासाठी आले असताना त्यांच्या काउंटरवर ठेवलेली ३५ लाख रुपये दागिने असलेली बॅग चोरट्यांनी पळविली होती. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांनी त्यावरुन चोरट्यांची ओळख पटविली असता ते ओडिशा राज्यातील असल्याचे पुढे आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे, पद्मसिंह कांबळे, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, कलीम शेख यांचे पथक तेलंगणा, आंध्र प्रदेश त्यानंतर ओडिशात पोहोचले. या ठिकाणी जवळपास महिनाभर मुक्काम या पथकाने केला. स्थानिक पोलिसांची मदत घेतली. तसेच गावातच खबऱ्यांचे नेटवर्क उभे केले. आरोपी असलेल्या गावात तेथील स्थानिक पोलिसही जायची कधी हिंमत करीत नव्हते. तिथे नांदेड पोलिस मात्र गुप्तपणे आरोपीच्या मागावर होते. आरोपीबाबत सर्व माहिती मिळाल्यानंतर पथक नांदेडात आले.
तोच खबऱ्याने आरोपी हा सोने विक्रीसाठी नांदेडात येणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच सापळा रचून भीमा धनू प्रधान रा. पुरबाकोटे, जि.जाजपूर याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ८ लाखांचे सोने जप्त केले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि उदय खंडेराय, सपोनि रवि वाहुळे, माधव केंद्रे, गुंडेराव करले, संग्राम केंद्रे, दीपक ओढणे, राजू सिटीकर, पद्मसिंह कांबळे, दीपक पवार, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, कलीम शेख, रेश्मा पठाण, गजानन बयनवाड, बावरी, महेश बडगू यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पाच जणांचा समावेश
नांदेडातील सराफा लूट प्रकरणात पाच आरोपींचा समावेश होता. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. इतर चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्या आरोपींना अटक करण्यात येईल. ■ या गुन्ह्याच्या तपासात सराफा व्यापारी प्रभाकर डहाळे यांनी ही वेळोवेळी पोलिसांवर विश्वास दाखविला. ते सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. अशी माहिती पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिली.

0 Comments