महाबळेश्वर, (प्रतिनिधी)तानाजी किर्दत
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर–तापोळा–वाकी हा महत्त्वाचा पर्यटन व ग्रामीण संपर्क मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून मोठ्या प्रमाणात खडी वर आली आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान रस्त्याच्या अनेक भागांमध्ये खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि साचलेली खडी आढळून आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली असून दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. एसटी बस चालक तसेच इतर वाहनचालकांनाही वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्यालगतच्या गटर लाईनमध्ये झाडे, झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पाणी साचून रस्त्याचे अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावर दररोज हजारो पर्यटकांची ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांनीही संबंधित विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) निवेदन देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती, खड्डे बुजविणे, गटर लाईनची स्वच्छता करणे तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडे-झुडपे हटविण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

0 Comments