बिलोली प्रतिनिधी:=विनोद वाघमारे
बिलोली तालुक्यातील बोळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वस्तीतील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्री संपूर्ण परिसर अंधारात बुडत आहे. अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. रात्रीच्या वेळी महिला, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाला अंधारातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अंधारामुळे चोरी, अपघात तसेच साप-विंचूसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वस्तीतील अनेक रस्त्यांवर पावसाचे व सांडपाण्याचे पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. डासांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेअभावी लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी आरोप केला की, दलित वस्तीच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध होत असतानाही प्रत्यक्षात आवश्यक विकासकामे दिसून येत नाहीत. पथदिवे, रस्ते, गटारी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

0 Comments