Ticker

6/recent/ticker-posts

पालघर-नाशिकला भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही, प्रशासन सतर्क



महाराष्ट्र हादरलं! पालघरमध्ये 3.1 तर नाशिकमध्ये 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

पालघर प्रतिनिधी | केविल पाटील 

महाराष्ट्रातील पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना शनिवारी (25 जुलै 2026) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही.

पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप

पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळी 10.57 वाजता 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र दहाणू तालुक्यातील गंजाड परिसरात होते.

आदिवासी भागात भीतीचे वातावरण

डहाणू , तलासरी, धुंदलवाडी आणि आसपासच्या आदिवासीबहुल भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिक काही काळ घराबाहेर पडले. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

यापूर्वीही जाणवले होते धक्के

दहाणू आणि तलासरी परिसरात यापूर्वीही कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के वेळोवेळी जाणवले आहेत. मात्र, गेल्या काही काळात या भागात भूकंपाची नोंद झाली नव्हती. त्यामुळे शनिवारी आलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

नाशिकमध्ये 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप

दरम्यान, नाशिक शहरासह परिसरातही शनिवारी सकाळी 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. धक्के जाणवताच अनेक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर धाव घेतली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही.

प्रशासन सतर्क

दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. संबंधित यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Post a Comment

0 Comments