Ticker

6/recent/ticker-posts

ते पन्नास दिवस’ : स्थलांतरित मजुरांच्या संघर्षाची कहाणी '



रुस्तम शेख यवतमाळ जिल्हाप्रतिनिधी :-

कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांनी अनुभवलेल्या संघर्ष आणि वेदनांचे वास्तव चित्र उभे करणाऱ्या कादंबरीचा आढावा.अलीकडे पवन भगत यांचे “ते पन्नास दिवस” हे पुस्तक वाचले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांनी अनुभवलेल्या कठीण परिस्थितीची ही कथा आहे. अचानक सगळं थांबलं—काम बंद झालं, हातात पैसा नव्हता आणि घरी जाण्याचा कोणताही मार्गही उरला नव्हता. अशा वेळी अनेक मजूर कुटुंबासह हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्या गावाकडे निघाले.

भूक, तहान, थकवा, उन्हाची तीव्रता आणि अनिश्चित भविष्य अशा अनेक अडचणी असूनही त्यांच्या मनात फक्त एकच आशा होती—कसेही करून आपल्या घरी पोहोचायचे. हे पुस्तक वाचताना त्या मजुरांचा संघर्ष, त्यांची वेदना आणि त्यांच्या मनातील घराची ओढ खूप जवळून जाणवते.आपण त्या काळात घरात सुरक्षित होतो; पण अनेक कुटुंबे रस्त्यावरून चालत आपल्या गावाकडे जात होती, ही जाणीव मनाला अस्वस्थ करते. लेखकाने साध्या आणि प्रभावी भाषेत त्या काळातील वास्तव मांडले आहे, त्यामुळे प्रत्येक प्रसंग वाचताना तो डोळ्यांसमोर उभा राहतो.

वर्ष 2020 हे वर्ष भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक मोठे आव्हान ठरले. अचानक आलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वांच्या जीवनात मोठे बदल झाले. विद्यार्थी, महिला, शिक्षक, कर्मचारी, संघटना अशा समाजातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम झाला.विशेषतः शहरांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना या काळात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. काम बंद झाले, उत्पन्नाचे साधन थांबले आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत आपल्या गावाकडे परतावे लागले.

या संपूर्ण परिस्थितीचे अत्यंत वास्तव आणि हृदयस्पर्शी चित्रण पवन भगत यांनी त्यांच्या ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीत केले आहे. या पुस्तकात त्या काळातील संघर्ष, वेदना आणि मानवी धैर्य प्रभावीपणे मांडले आहे.

या कथेचा मुख्य नायक म्हणजे रामस्वरूप. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तो इतर लाखो मजुरांप्रमाणेच एक सामान्य मजूर म्हणून काम करत असतो. परंतु मुंबईत येण्याआधी तो इतिहास विषयात एम.ए. करत असलेला विद्यार्थी होता. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आईला मदत करण्यासाठी त्याला शिक्षण अर्धवट सोडून कामासाठी मुंबईत यावे लागले.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक आणि कामे अचानक बंद झाली. त्यामुळे रामस्वरूपसारख्या अनेक मजुरांसमोर घरी परत जाण्याचा प्रश्न उभा राहिला. रेल्वे स्टेशनवर त्याची भेट पंडित बिजमोहन मिश्रा आणि आरिफ यांच्याशी होते. तिघांनाही गावाकडे जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध होत नाही. शेवटी ते पायी गावाकडे निघण्याचा निर्णय घेतात.

प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रवासात दीपाली नावाची एक मुलगीही त्यांच्यासोबत असते. शेवटी दीपाली तिच्या गावात पोहोचते; मात्र तिला क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते.

दरम्यान आरिफ आणि पंडित मिश्रा एकत्र प्रवास करत राहतात. प्रवासातील थकवा आणि अडचणींमुळे पंडित मिश्रा झोपेतच मृत्यू पावतात. या घटनेनंतर आरिफ पूर्णपणे एकटा पडतो. तो पंडित मिश्रा यांच्या अस्थींसोबत बोलत राहतो. इतक्या मोठ्या दुःखामुळे त्याची मानसिक अवस्था ढासळते. नंतर त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. सुटका झाल्यानंतर तो पंडित मिश्रा यांच्या अस्थी त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी निघतो आणि अशा प्रकारे कथेचा शेवट होतो.

‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरित मजुरांच्या दुःख, संघर्ष आणि मानवी संवेदनांचे जिवंत चित्र उभे करते. या कादंबरीतून त्या काळातील समाजाची वास्तविक परिस्थिती स्पष्ट होते. त्यामुळे ही कादंबरी वाचकाला विचार करायला भाग पाडते आणि माणुसकीचे महत्त्व अधोरेखित करते.– कु.जान्हवी भोयर(एम ए भाग  १, नेहरू महाविद्यालय नेर परसोपंत जि. यवतमाळ )

Post a Comment

0 Comments