दिवंगत लंकाबाई खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुद्ध मूर्ती राजेश खंडारे यांनी दिली दान ; धम्मरॅली, बुद्ध वंदना व धम्मदेसनेने कोकर्डा गाव झाले बुद्धमय


दैनिक लोकयुवा अंजनगाव सुर्जी | श्रीरंग बोडखे, तांलुका प्रतिनिधी 

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथील विश्वशांती बुद्ध विहारात रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि वर्षावास समारोपीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिवंगत मातोश्री लंकाबाई शामरावजी खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजेश खंडारे यांनी बुद्धमूर्तीची स्थापना केली. या मंगल सोहळ्यानिमित्त धम्मध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना, धम्मरॅली, बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक, धम्मदेसना आणि भोजनदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना आणि ध्वजवंदना व ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर पूज्य भदंत सिरीसिवली यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पूज्य भदंत नागपूर यांच्या हस्ते बुद्धरूपाची धूप, दीप व २८ बुद्धांना स्मरून त्यांच्या गुणाची गाथा म्हणण्यात आली. दुपारच्या सत्रात भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची कोकर्डा गावातून शांततेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि’ या त्रिशरणाच्या जयघोषाने संपूर्ण कोकर्डा  परिसर धम्ममय झाला होता.

या कार्यक्रमाला नागपूर येथून विशेष उपस्थिती लाभलेले सीए आणि आधुनिक अनाथपिंडक म्हणून परिचित असलेले धम्म प्रचारक शरद कुमार चौरपगार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांनी उपस्थितांना धम्मविचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतता, करुणा, समता आणि मानवतेचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बुद्धांच्या विचारांचे अनुसरण करून धम्माच्या मार्गावर वाटचाल करावी, तसेच धम्मकर्म आणि सदाचार यांची सांगड घालून सम्यक मार्गाने जीवन जगावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या सोहळ्याला अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे, खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल मुंडे, धम्मप्रचारक शरद कुमार चौरपगार आणि राजेश शामराव खंडारे यांच्यासह अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. खासदार बळवंत वानखडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मूर्ती दान दाते राजेश खंडारे पत्नीसह व धम्म प्रचारक शरदकुमार चोरपगार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विरत्न महिला संघ आणि निळे वादळ मित्र मंडळ, कोकर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ समारोपीय कार्यक्रम व बुद्ध मूर्तीची स्थापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धभूषण गवई यांनी केले. परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, महिला संघाच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

तथागत गौतम बुद्धांचा समता, बंधुता, प्रज्ञा, करुणा आणि शांततेचा संदेश समाजात रुजविणे, तसेच नव्या पिढीपर्यंत बौद्ध संस्कृती आणि धम्मविचार पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. ग्रामस्थ, महिला संघ आणि आयोजकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने कोकर्डा परिसरात बुध्दमय आणि धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.